Ahilyanagar News | जलसंपदा मंत्र्यांची मैदानात फटकेबाजी ; बुद्धीबळातही आजमावले कौशल्य..

प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द मंत्र्यांनीच हातात घेतलेली बॅट घेतल्याच दिसून आल. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात शासनाच्या जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना लोणी बुद्रुक येथे शानदार सुरुवात झाली.

Feb 7, 2026 - 19:49
Ahilyanagar News | जलसंपदा मंत्र्यांची मैदानात फटकेबाजी ; बुद्धीबळातही आजमावले कौशल्य..
जलसंपदा मंत्र्यांची मैदानात फटकेबाजी

अहिल्यानगर: प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द मंत्र्यांनीच हातात घेतलेली बॅट घेतल्याच दिसून आल. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात शासनाच्या जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना लोणी बुद्रुक येथे शानदार सुरुवात झाली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन (Girish Mahajan) व जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळात सहभाग नोंदवत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.

​प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध क्रीडांगणांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये पुरुष व महिलांसाठी क्रिकेट, कबड्डी, बुद्धीबळ व जलतरण यांसारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचा शुभारंभ केल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी केवळ औपचारिक हजेरी न लावता क्रिकेटच्या खेळपट्टीवर बॅटिंगचे कौशल्य आजमावले. तसेच बुद्धीबळाच्या पटावरही काही वेळ चाल खेळत बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवली.

​यावेळी मंत्री महाजन आणि मंत्री डॉ. विखे पाटील यांनी कबड्डीपटू व इतर स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. "खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते. निरोगी आयुष्यासाठी खेळाची नितांत गरज आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळून प्रशासनात शिस्त व आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल," असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव (लाभक्षेत्र विकास) संजय बेलसरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध जिल्ह्यांतून आलेले खेळाडू व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या 'पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2026' च्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्र्यांच्या सक्रिय सहभागाने खेळाडू भारावले

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, मी स्वतः शालेय जीवनापासून खेळाशी जोडलेलो आहे. एक खेळाडू म्हणून मला खेळाचे महत्त्व जवळून माहित आहे. तुम्ही या स्पर्धेकडे नियमित व्यायाम व सराव म्हणून पाहिले पाहिजे. जीवनात शारीरिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम ही आपली रोजची गरज बनली पाहिजे. जेव्हा आपली शरीरयष्टी चांगली असते, तेव्हा मनही सुदृढ राहते. सुदृढ मनामुळे कामात एकाग्रता वाढते, चिडचिड होत नाही व कामाचा अतिरिक्त ताण जाणवत नाही. 

आजच्या धावपळीच्या युगात कामाचे ओझे निश्चितच जास्त आहे, पण त्यावर मात करण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा-पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढा. धावणे, चालणे किंवा योगासने करा. अनेकदा तणाव आला म्हणून लोक व्यसनाचा आधार घेतात, परंतु तणाव कमी करण्यासाठी व्यसनाची मुळीच गरज नसते. जर तुमची तब्येत चांगली असेल, तर मनस्थिती आपोआपच चांगली राहते. तुमच्या मनगटात ताकद असेल, तर मनात आपोआप धाडस निर्माण होते. हे केवळ नियमित व्यायाम व सुदृढ शरीरामुळेच साध्य होऊ शकते, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

7 ते 9 फेब्रुवारी तीन दिवस स्पर्धा


​पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, सहकाराचा वारसा लाभलेली ही भूमी आता क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करत आहे. ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजविण्याचे आमचे ध्येय आहे. अहिल्यानगरच्या मातीत सेवाभाव व खेळाडूवृत्तीचा अनोखा संगम साधला गेला असून, स्पर्धेतील जय-पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

​अपर मुख्य सचिव कपूर म्हणाले, स्पर्धेत केवळ सहभाग महत्त्वाचा नसून जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळा. क्रीडांगणात उतरल्यावर विजय मिळवण्याच्या उद्देशानेच खेळले पाहिजे. मंत्रालयातील दैनंदिन कामातून वेळ काढत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सरावाचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धेसाठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.  कार्यक्रमात अर्जुन पुरस्कारार्थी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी खो-खो खेळाडू कु. श्वेता गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.